हिंदोळा (मराठी दिर्घकथा संग्रह)

भाग १३ – “सप्तपदी”


रंग २ – “आकर्षण”

प्रदोष १७ – “ठेच”


आपल्या प्रिय व्यक्तीची आपल्याला काळजी का वाटते, याची अनेक कारणे सांगता येतील. परंतु काही घटना अशा असतात, जिथे आपण पूर्णपणे हतबल ठरतो. घटना घडून जाते; आणि मागे उरते ती फक्त काळजी.


 पावसाळा संपला होता आणि दिवाळी जवळ आली होती. त्यामुळे माडीवरील वातावरणातही बदल जाणवू लागला होता. प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त झाला होता. घरात साफसफाईची कामे सुरू होती.


त्यातच विद्यापीठाच्या हिवाळी सत्राचे वेळापत्रक जाहीर झाले. निशाला तिचा राहिलेला पेपर द्यायचा होता. तिने अभ्यासाला सुरुवात केली. परीक्षेचे वेळापत्रक बरेच आधी जाहीर झाले होते. त्याकडे लक्ष न दिल्यामुळे ती स्वतःलाच दोष देत होती.


तिची परीक्षा असल्याचे कळताच त्या संध्याकाळी ताईसाहेब तिच्या खोलीत गेल्या. ती अभ्यास करत बसली होती. मायेने तिच्या पाठीवर हात फिरवत त्या म्हणाल्या, “पोरी, यावेळी चांगला पेपर लिही. सर्व काही ठीक होईल. तुझे एक वर्ष विनाकारण वाया जाणार नाही.”


तिने अभ्यासाची जोरदार तयारी सुरू केली होती. स्वयंपाक आणि घरकामातून तिला थोडी मोकळीक मिळाली होती. तिचे पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित झाले होते. अर्थात, दिनू दिसला की ती अलगद त्याच्याकडे ओढली जात असे; पण ते क्षणिकच असे.


एक पुस्तक नसल्याचे तिच्या लक्षात आले. गावातील एका मैत्रिणीकडे तिने ते दिले होते. काय करावे, या विचारात ती असतानाच तिला अंगणात दिनू दिसला. त्याला बोलावून तिने ते पुस्तक आणण्यास सांगितले. तो गेल्यावर मात्र ती स्वतःशीच हसत होती.


त्याने लगबगीने सायकलवर जाऊन ते पुस्तक तिला आणून दिले. इतक्या लवकर तो परत आल्याने तीही अवाक झाली. त्याच्या चपळाईने काम करण्याच्या पद्धतीवर ती फिदा झाली. पुस्तक देताना तो तिला तिच्या वर्गमित्रासारखा भासला. ती त्याच्याकडे पाहतच राहिली.


अगदी मन लावून ती अभ्यास करू लागली. हा विषय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायचा, असा तिचा निर्धार होता. तिच्यात संचारलेल्या उर्जेचे तिलाच विशेष आश्चर्य वाटत होते. हळूहळू तिचा आत्मविश्वास प्रबळ होऊ लागला; आणि ती अभ्यासाचा आनंद घेऊ लागली.


प्रदोषव्रताच्या दिवशी तिने पुस्तकातील सतरावे प्रकरण वाचण्यास घेतले. प्रदोषकाळात वातावरणात सूक्ष्म ऊर्जा प्रवाहित होत असते, असे मानले जाते. या काळात ध्यान केल्यास त्या ऊर्जेचा अनुभव येतो. साधकाच्या मनावर त्याचा सकारात्मक परिणाम होऊन मानसिक स्थैर्य प्राप्त होते. हा अनुभव आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.


दही हे स्थैर्य आणि पोषणाचे प्रतीक मानले जाते. पंचामृतामध्ये त्याचा समावेश असतो. दही अर्पण केल्याने जीवनात स्थैर्य प्राप्त होते, असा विश्वास आहे. शरीरासाठीही ते हितकारक असल्याने पूजेत त्याचा उपयोग केला जातो. यावेळी तिने दह्याचा वापर करण्याचे ठरवले.


तळघरातील पूजेच्या खोलीत ती आल्यावर तो तिला सांगू लागला, “पहिल्यांदा अनास्तास्याने, म्हणजे तू, मला दरबारातील कागदपत्रे घेऊन जाताना पाहिले होतेस. माझ्या चेहऱ्यावर एक निरागसता आणि स्थिरता होती. मी नजर चुकवत आपल्या कामात गुंतलेलो होतो. त्यावेळी तुझ्या मनात एक हलकीशी उत्सुकता निर्माण झाली होती. मी मात्र तुझ्या अस्तित्वापासून पूर्णपणे अनभिज्ञ होतो.”


थोडासा उदास होत त्याने तिच्याकडे पाहिले. हताशपणे तो म्हणाला, “तुझे वडील आणि तू स्वमग्न असताना मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण होईल. पण मी चपळाईने ती परिस्थिती हाताळीन. मात्र, त्यात मला किती लागेल, हे मलाही ठाऊक नाही.”


तो उदासपणे त्या खोलीतून बाहेर पडला. त्याचे बोलणे ऐकून ती गहिवरली होती. तिच्या डोळ्यांतून टचकन आसवे ओघळली. कसाबसा स्वतःला सावरत तिने पूजेला सुरुवात केली; आणि त्याच्या भल्यासाठी देवाजवळ प्रार्थना केली.


परीक्षेच्या दिवशी ती भल्या पहाटे उठली होती. अभ्यासाची एक उजळणी तिने केली. स्वतःला आवरून तिने परीक्षेची तयारी केली. तरीही तिच्या धांदरटपणामुळे ओळखपत्र आणि हॉलतिकीट शोधण्यात तिचा बराच वेळ गेला. गडबडीत तिने ती प्रदोषव्रताच्या पुस्तकात ठेवली होती.


दौलतरावांनी दिनूला सकाळीच लवकर बोलावून घेतले होते. ते तिच्यासोबत परीक्षाकेंद्रावर जाणार होते. तालुक्याच्या ठिकाणी महाविद्यालय असल्याने तेथील काही कामेही उरकून घेण्याचा त्यांचा विचार होता. सोबत कुणीतरी असावे म्हणून त्यांनी दिनूला घेण्याचा निर्णय घेतला होता. तो तितकाच विश्वासू आणि कामात चाणाक्ष ठरला होता.


सकाळी आल्याआल्या त्याने जीपगाडी स्वच्छ केली. दौलतराव स्वतः ती चालवत तिला आणि त्याला तालुक्याच्या ठिकाणी घेऊन जाणार होते. तोही तसा खुश होता; कारण त्याला जीपगाडीत बसायला मिळणार होते. ती खुश होती; कारण तो तिच्या सोबत होता. आणि दौलतरावही आनंदी होते; कारण त्यांना बऱ्याच दिवसांनी जीप चालवायला मिळणार होती.


त्या दिवशी सकाळी ताईसाहेब आणि सारीका यांनी मिळून शिरा व चहा बनविला होता. दिनू आणि दौलतराव यांनी अंगणातच सकाळच्या कोवळ्या उन्हाचा आनंद घेत त्याचा आस्वाद घेतला. निशा आवरून गडबडीत खाली आली. ताईसाहेब, सारीका आणि तिने दिवाणखान्यात शिरा व चहा घेत हलक्याफुलक्या गप्पा मारल्या. देवघरातील देवांना आणि ताईसाहेबांना नमस्कार करून ती बाहेर पडत होती.


दिवाणखान्यातून बाहेर पडत असताना दौलतरावांनी तिला आवाज दिला. तितक्यात ती उंबरठ्यावर अडखळली; आणि तिच्या उजव्या पायाला ठेच लागली. पायात एक तीव्र सनक उठली होती; पण तिने स्वतःला आवरले.


जीपगाडीत बसल्यानंतर त्यांचा प्रवास सुरू झाला. दिनू मागच्या आसनावरून अवतीभवती पाहत निसर्गाचा आनंद घेत होता. दौलतराव गाडी चालवण्यात मग्न झाले होते. तो सोबत असल्याने तिला प्रसन्न वाटत होते; तर परीक्षा असल्यामुळे तिच्या हृदयाची धडधड वाढली होती.


परीक्षाकेंद्रावर पोहोचल्यावर तिने त्यांच्या पाया पडली. त्यांनी भारावून तिला आशीर्वाद दिला. तो मात्र फक्त हसत होता; कारण शिक्षणाशी त्याचा काडीमात्र संबंध नव्हता. चांगली तयारी झालेली असल्याने तिला पेपरही सोपा गेला.


त्यादरम्यान त्यांनी ठरवलेली कामे त्याच्या सोबतीने मार्गी लावली. त्यांचे जुने मित्र बऱ्याच दिवसांनी भेटले होते. त्यांच्यासोबत जुन्या आठवणींना उजाळा मिळाला होता. त्याच्यासाठी हे सगळेच नवीन होते. तो कुतूहलाने प्रत्येक गोष्ट न्याहाळत होता.


तिची परीक्षा संपण्याच्या वेळी ते त्याच्यासोबत महाविद्यालयात पोहोचले. सर्व विद्यार्थी बाहेर पडल्याने वाहनतळावर बरीच गर्दी झाली होती. ती शोधत शोधत त्यांच्यापाशी येऊन पोहोचली. पेपर सोपा गेल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. तिला हसतमुख पाहून तेही आनंदित झाले.


 फाटकापाशी गाडी मागे घेत असताना एक मुलगा स्वतःच्याच धुंदीत चालत होता. त्यांना तो मुलगा दिसला नाही. फाटकाची भिंत आणि गाडी यांच्या मध्ये तो मुलगा अडकणार, इतक्यात दिनूने त्याला झटकन मागे ढकलले; पण त्या प्रयत्नात दिनू स्वतःच अडकला. गाडी आणखी थोडी मागे सरकणार, तितक्यात त्या मुलाने ओरडताच त्यांनी कचकन ब्रेक दाबून गाडी थांबवली.


त्यांनी गाडी पुढे घेतली. दिनूचा उजवा भाग भिंत आणि गाडीचा मागील भाग यांच्या मध्ये थोडासा दबला गेला होता. घडलेला प्रकार अत्यंत भयानक होता. तो तसाच खाली बसला. त्यांनी गाडीतून उतरून त्याला उभे केले, तेव्हा काहीच झाले नाही, असा आविर्भाव तो आणत होता.


त्याला मुका मार लागल्याचे तिला जाणवत होते; पण तो शांत होता. वेदना होत असूनही तो त्या चेहऱ्यावर उमटू देत नव्हता. तिने मागे वळून त्याच्याकडे पाहिले, तेव्हा तो फक्त हसला.


आणि, त्याच्या त्या सहनशीलतेचे तिला विलक्षण आकर्षण वाटू लागले.


 – प्रशांत सिनलकर