हिंदोळा (मराठी दिर्घकथा संग्रह)
भाग १३ – “सप्तपदी”
रंग १ – “आश्चर्य”
प्रदोष ११ – “कावळा”
प्रिय व्यक्तीचा आवाज सतत कानांत गुंजत राहतो. त्यातील माधुर्य आणि बोलण्याची शैली मनाला हवीहवीशी वाटते. संवादातून ती प्रिय व्यक्ती आपल्या अस्तित्वाचा एक भाग बनत जाते. बोलण्यातील चढउतार अनेक गोष्टींचे सूचक ठरतात. अर्थात, त्यांचा योग्य रीतीने अर्थ लावणे, यातच आपल्या समजुतीची खरी कसोटी लागते.
कोंबड्यांच्या कारखान्यात झालेल्या नुकसानीचे अनेक कंगोरे होते. यामुळे दौलतरावांच्या इभ्रतीचे वाभाडे निघण्याची शक्यता होती. गावातील राजकारणावरील त्यांची पकड ढिली होऊ लागणार होती. प्रकरण अधिक चिघळल्यास अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होऊ शकत होता; आणि त्याची मोठी झळ सहकाऱ्यांनाही बसणार होती.
दबा धरून बसलेले विरोधक बेभान झाले होते. त्यांना आयते कोलित मिळाले होते. अगदी दुसऱ्याच दिवशी वर्तमानपत्रांत मोठी बातमी प्रसिद्ध झाली. त्यात सर्वस्वी दौलतरावांचीच चूक असल्याचे भासविण्यात आले होते. माडीवर सकाळी वर्तमानपत्र वाचत असताना ते नुसतेच हसले; परंतु थोड्याच वेळात गंभीर होऊन विचारमग्न झाले.
दिवाणखान्यात त्यांना या स्थितीत पाहून ताईसाहेब शेजारच्या खुर्चीत जाऊन बसल्या. वर्तमानपत्रातील ती बातमी त्यांच्याही नजरेस पडली. त्यांनी ती पूर्ण वाचून काढली. आपल्या जोडीदाराची होत असलेली खोटी बदनामी त्यांच्या मनाला खटकून गेली. त्यांच्याकडे पाहताच त्यांच्या डोळ्यांत पाणी तरळले.
एकूणच कोंबड्यांच्या कारखान्याची अधोगती सर्वांसाठी धक्कादायक ठरली. अनेकांचा उदरनिर्वाह त्यावर अवलंबून होता. पंचक्रोशीतील राजकारणातील तो एक महत्त्वाचा घटक होता. त्यामुळे काही सदस्य हवालदिल झाले. त्यांनी सखोल चौकशीसाठी अर्ज केला.
सकाळी माडीवर चहा-नाश्ता करीत असताना ही गोष्ट निशाच्या कानावर आली. त्यानंतर तिने वर्तमानपत्र दोन-तीनदा वाचून काढले. आपले वडील असे नाहीत, ही तिची धारणा अत्यंत ठाम होती. हा सगळा नियतीचा खेळ आहे का आपल्या चुकीचे फळ, हे तिला उमजत नव्हते. त्यामुळे तिला वडिलांची काळजी वाटू लागली.
सकाळच्या उन्हात अंगणात येरझाऱ्या घालत असताना तिला दिनू नजरेस पडला. माडीच्या एका कोपऱ्यात तो साफसफाई करीत होता. तिची बहीण सारीका त्याची मस्करी करण्यात दंग होती; तो मात्र “जी, बाईसाहेब” इतकेच म्हणून प्रतिसाद देत होता. त्याचा तो आवाज तिला भावला होता.
मुळात त्याचा तो भाबडेपणा तिला फार आवडत होता. कदाचित हाच त्याचा गुण तिच्या मनाला भुरळ घालू लागला होता. ती त्याच्या विचारांत गुंग झाली. अनाहूतपणे ती आपल्या बहिणीकडे गेली; आणि त्याची चेष्टा-मस्करी करण्यात मशगुल झाली.
प्रदोषव्रत करताना तांदूळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तो शुभता, पूर्णता व अखंडतेचे प्रतीक आहे. शिवलिंग/मूर्तीसमोर हळद-कुंकू लावलेले तांदूळ अर्पण करतात. प्रत्येक मंत्रानंतर अक्षता अर्पण केल्याने पूजन पूर्णत्वास जाते. तिच्या वडिलांच्या मित्राने कर्नाटकातून आणलेला सोना मसुरी तांदूळ ती पूजेसाठी वापरणार होती.
प्रदोष हे व्रत भगवान शिवांचे आहे. त्यामुळे या दिवशी ती दिवसभर उपवास व उपासना करून रात्री शिवपूजनानंतर भोजन करीत असे. प्रदोषाच्या दुसऱ्या दिवशी ती श्रीविष्णूचे पूजनही आवर्जून करीत असे. त्या दिवशी उत्तरायणात प्रदोषव्रताचा प्रारंभ करण्यासाठी ती पूजेच्या खोलीत गेली, तेव्हा दिनूने ती खोली पूजेसाठी सज्ज करून ठेवली होती. तिच्याकडे पाहत तो त्यांच्या चौथ्या जन्माविषयी सांगू लागला.
त्या काळी तिचे नाव इसाबेल, त्याचे नाव एतिएन, तर तिच्या वडिलांचे नाव प्रोफेसर लॉराँ असे होते. इसाबेल अत्यंत विदुषी व सौम्य स्वभावाची होती, तर एतिएन परिश्रमी व निष्ठावान सहाय्यक म्हणून ओळखला जात असे. प्रोफेसर लॉराँ यांच्या मार्गदर्शनाखाली एतिएन विद्येची साधना करीत होता आणि त्यातूनच इसाबेल व एतिएन यांच्यात एक सूक्ष्म, अबोल स्नेहबंध निर्माण झाला. विद्यापीठातील शैक्षणिक वातावरण, ग्रंथांचा सहवास आणि ज्ञानचर्चा यांमुळे त्यांच्या नात्याला एक वेगळी गूढ छटा लाभली होती. त्या चौथ्या जन्मातही त्यांच्या भावनांना स्पष्ट शब्द लाभले नाहीत; मात्र त्यांचे अंतःकरण एकमेकांशी निःशब्दरीत्या जोडले गेले होते.
आनंदाचे रूपांतर काळजीत होताच तो म्हणाला, “याही जन्मात पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येईल; त्यात कावळ्याचा एक विचित्र आवाज मिसळलेला असेल. तो अनपेक्षित घटनांचे संकेत देईल, आणि तुझे घर कलंकित होईल.”
त्याचे हे शब्द ऐकताच ती दचकली. काहीतरी अभद्र घडणार, या विचाराने ती चिंतातूर झाली. परंतु थोड्याच वेळात भानावर येत तिने पूजेवर लक्ष केंद्रित केले. फुले, दिवा व अक्षता यांच्या साहाय्याने तिने मनोभावे उपासना करून विधी यथासांग पार पाडला. ती आता परिस्थिती समजून घेऊ लागली होती.
आपल्या मनातील विचार दिलखुलासपणे व्यक्त करण्यासाठी तिचे खास असे कोणी नव्हते. त्यामुळे अनेकदा तिची तगमग होत असे. एक दिवस माडीच्या मागील भागात दिनू शेणाच्या गोवऱ्या रचत होता. ती उगाचच दोरीवरील कपडे काढण्याच्या निमित्ताने तिथे गेली; परंतु त्याला पाहिल्यावर तिला काय बोलावे, हेही सुचेनासे झाले.
तरीदेखील ती बोलू लागली. दोरीवरील कपडे काढता काढता ती त्याला म्हणाली, “दिनू, तुला माहीत आहे का? तुझ्या मालकाबद्दल एक वाईट बातमी आली आहे. तू ती वाचली आहेस का?” तिचे ते शब्द अक्षरशः त्याच्या डोक्यावरून गेले.
तितक्यात शांत वातावरणात माडीपाशी चिमण्यांचा प्रचंड चिवचिवाट सुरू झाला. दोघांनाही एकमेकांचे शब्द ऐकू येईनासे झाले. तो त्या चिमण्यांकडे निरखून पाहू लागला; तर तिला मात्र त्याचा राग येऊ लागला. इतक्यात एक कावळा विचित्र आवाजात कावकाव करू लागला.
तो आवाज ऐकताच तो घाबरून म्हणाला, “बाईसाहेब, हा कावळा बघा, कसा कावकाव करीत आहे! हे काहीतरी विपरीत आहे. आज नाहीतर उद्या येथे काहीतरी वाईट घडणार आहे.” त्याचे ते शब्द आणि व्रताच्या दिवशीचा त्याचा अंदाज, यात बरेच साम्य तिला जाणवले. ती काहीही न बोलता तिथून निघून गेली.
अगदी तसाच प्रकार दुसऱ्याच दिवशी घडला. माडीवर सर्वजण सकाळी न्याहारी करीत असताना पोलिसांनी तेथे हजेरी लावली. दौलतरावांनी त्यांना दिवाणखान्यात बसवले. चहापाणी देऊन त्यांच्याशी चर्चा केली. नामांकित घराणे असल्याने पोलीसही अदबीने बोलत होते.
त्यांच्याविरुद्ध पोलिस चौकीत तक्रार दाखल झाली होती. तक्रार नाममात्र असली तरी चौकशीसाठी जाणे त्यांना क्रमप्राप्त होते. त्यांनी आपल्या वकिलांना दूरध्वनी करून सविस्तर चर्चा केली. दुपारी पोलिस चौकीत येण्यास त्यांनी मान्यता दिली आणि आलेल्या पोलिसांना निरोप दिला.
हा सगळा प्रकार ताईसाहेबांसाठी नवीन होता. आपल्या जोडीदारांनी असा काय गुन्हा केला, हा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला. खरंतर यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. त्यांच्या हळव्या मनात कल्लोळ माजला; आणि डोळ्यांतून न थांबणाऱ्या अश्रूंच्या धारा सुरू झाल्या.
सारीकाला तर धस्स झाले होते. ती काहीही बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हती. विराजशेठ मात्र प्रकरण ताणून धरण्याच्या विचारात होते. ते त्यांना म्हणाले, “काहीही फरक पडत नाही; थोडा वेळ जाऊ द्या.”
दौलतराव मात्र शांतपणे सर्व काही ऐकत होते. घरातील सर्वांवर एक नजर टाकत ते म्हणाले, “यातून काही निष्पन्न होणार नाही; मात्र काळजी घ्यावी लागेल. प्रत्येक गोष्ट धीराने घ्यावी लागेल. हा काळ गेल्यावर परिस्थितीही बदलेल.”
हळूहळू सर्वजण तिथून निघून गेले. निशा आणि तिचे वडील दिवाणखान्यात बसून राहिले होते. तिच्याकडे हसून पाहत ते म्हणाले, “पोरी, खचू नकोस. यातून खूप काही शिकण्यासारखे आहे.” एवढे म्हणत ते उठून गेले; आणि तिचा चेहरा चिंताग्रस्त झाला.
दिवाणखान्यातून पोलिस बाहेर पडताना दिनूने पाहिले होते. पोलिस म्हणजे काहीतरी आगळीक, अशी त्याची पक्की समजूत होती. त्यांना पाहून त्याला घाम फुटला. पोलिसांची गाडी दूरवर जाईपर्यंत तो नुसताच तिच्याकडे पाहत राहिला. तो पूर्णपणे भांबावून गेला होता.
नाही म्हटले तरी माडीला आज एक कलंक लागला होता. बदनामी आणि चौकशीच्या चक्रव्यूहात तेथील माणसे अडकू लागली होती. ती दिवाणखान्यातून बाहेर आली, तेव्हा तो मख्खपणे उभा होता. इतक्यात पुन्हा चिमण्यांचा चिवचिवाट आणि त्यात मिसळलेली कावळ्याची कावकाव तिच्या कानावर आली. त्या अनपेक्षित आवाजाने ती क्षणभर थबकली;
आणि, त्याच्या भांबावलेल्या अवस्थेचा ती आश्चर्याने विचार करू लागली.
– प्रशांत सिनलकर